Monday, August 7, 2023

कल्पना करा

 आत्ता मस्त आरामखुर्चीत बसुन कल्पना करा...


तुम्ही उम्बरखिंडीत कीरर्र् अंधारात एका झाडाच्या सापटीत श्वास रोखून बसला आहात. हातातले नांगर, पळी-पंचपात्र, आरी, हातोडी जाऊन नंगी तलवार आहे. खालून प्रचंड धिप्पाड अफगाण तोफा रेटत चाललेत. आपण नुसती वाट बघणे - ना सोनं नाणं, ना आराम, ना झोप, ना सुख. तुमचे शांत घर, गाव आणि माणसे सोडून इथे भुतासारखे लटकलायत; कदाचित कधीच परत न जाण्यासाठी. काय गरज आहे या सगळ्याची?

पण.. उद्या हे पठाण आपल्याच गावात पोहोचतील आणि??? तुम्ही आज इथे पडाल किंवा उद्या गावात घरी हाल होऊन. 

तेवढ्यात एक खुणेची शीळ घुमते, खुद्द राजे जंगलाच्या तोंडाशी आलेत... तुम्ही भानावर येता...या युद्धात आपला राजा आपल्याबरोबर पाय रोवुन उभा आहे. तुम्ही शिवाजीराजांना वचन दिलय आणि त्यांनी तुम्हाला... हा लढा कोणा मराठा जहागीरीचा किंवा वतनाचा नाही, स्वराज्याचा आहे.

अंगातुन आग पेटते, तलवारीची पकड घट्ट होते, तीरकमठे ताणले जातात आणि जंगलात गर्जना घुमते 'हर हर' ....