Tuesday, September 30, 2008

मी आहे हा असा आहे

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...

अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नाहीतर निघून जा....

पुरणपोळी चाख्रतो मी, तंगडीदेखील तोडतो मी.

हिंदी सिनेमे पाहतो मी, विंग्रजीसुद्धा झाडतो मी,
'दादांना' मात्र तोड नाही एवढेच फक्त मानतो मी.

शिव्या सुद्धा देतो मी, कविता देखील करतो मी,
कधी कुणालाही हरवतो मी, कधी जिंकता जिंकता हरतो मी.

अध्यात्मावर बोलतो मी, फ्लर्टिंगसुद्धा करतो मी,
मी मी करतो मी, कधी सेल्फलेस देखील होतो मी.

प्रेम करत नाही कुणी म्हणून डिप्रेस्स सुद्धा होतो मी,
स्वःतालाच समजावतो मग, "नाही रे, त्यांच्याच नशिबात नाही मी!"

कधी देवाशी बोलतो मी, कधी मौनाला धरतो मी,
जिवलग एखादा चुकलाच तर लेक्चर सुद्धा झाडतो मी.

प्रश्न सगळ्या जगाचे सोडवायला, नेहमीच असतो उत्सुक मी,
स्वःताचे प्रश्न सोयीने मात्र, अनुत्तरीतच ठेवतो मी.

" आपलं आयुष्य वेगळं, आपली दुःख वेगळी!"
नेहमी स्वःताच्याच कक्षेत फिरतो मी.....

सभोवती मात्र जेव्हा, असहाय्य दीन पाहतो मी,
ख्ररच, स्वःताला खूप भाग्यवंत समजतो मी.

मी आहे हा असा आहे,पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या

....सुशांत !

Monday, September 22, 2008

दो मोती गलत, दस-बीस अश्राफत, रुपयोंकी गिनती नही।

सध्या मी पेशवाई इतिहासावर घसरलोय, ते देखिल उलट्या क्रमाने! आधी स्वामी वाचले, मग पानिपत आणि आता राउ सुरु केले.
पानिपत---मराठी ह्रुदयात घुसलेला एक तुकडा- अजुनही पानिपत म्हटले कि ते २५० वर्षापुर्वीचे ते महायुद्ध मनात एक कळ उठवते. आणि गंमत म्हणजे लोकं नुसतेच उसासे सोड्तात, पण त्यांनादेखिल नक्की काय झाले हे माहित नसते. मी पुस्तक वाचले आणि चक्क ब्लॉगवर लिहिण्याइतका प्रभावित झालो.
मला पुस्तक वाचुन जाणवले म्हणजे हे केवळ मराठ्यांच्या उत्तरेतील अस्मितेकरिता युद्ध नव्हते, it was a battle of dark horses. everyone was there to prove himself. प्रत्येक जण स्वतःला prove करण्यासाठी झगडत होता; प्रत्येक जण; भाउसाहेब- ज्यांनी फडावर पै-पै च हिशोब चोख ठेवला होता, १७ वर्षांचा कोवळा विश्वासराव - असे म्हणत कि हिंदुस्थानात ’स्त्रियात देखणी मस्तानी आणि पुरुषांत विश्वास’ , मस्तानी-बाजीरावाचा उपेक्षित पुत्र समशेरबहाद्दर, दगाबाज जातिचा म्हणुन हिणवला गेलेला इब्राहिमखान गारदी, वीर दत्ताजीचा पुत्र जनकोजी सगळे बेभान होऊन रणांगणावर उतरले. भुतासारखे गिलच्यांवर नाचले आणि विझुन गेले. आणि ज्यांचा भरोसा करावा ते होळकर, शिंदे, विंचुरकर, गायकवाड माणकेश्वर त्यांना सोडुन निघुन आले. प्रत्येक व्यक्तिची स्वतःची समिकरणे होती, आणि दुःखाची गोष्ट म्हणजे सगळीच समीकरणे चुकली- अब्दालीची देखील. एकाचाच विजय झाला -नजिबाचा.
४५ हजार मराठी सैन्य जवळ जवळ ५० हजार बुणगे, बायका आणि भट - भिक्षुकांना वाचवत कापले गेले. एक पुर्ण मराठी पिढी पानिपतावर गेली आणि तरिही पेशवाई काही शिकली नाही. माधवराव, नारायणराव एक एक करत राजकारणाचे बळी पडले.
इतका रंजित इतिहास ललित स्वरुपात लिहिण्याची कठिण जबाबदारी विश्वास पाटिलांनी समर्थपणे पेलली आहे. शिवाजी आपल्याला पाठ असतो, बाजीरावाच्या दंतकथा आपण ऐकुन असतो, पण कधी कधी कडु लागले तरी पराभवाची उगाळणी करणे आवश्यक असते, नाहितर वॉलॉंग आणि नेफा परत परत होत राहते.
असो, पण कधितरी ४५ हजार अनामिक मराठा हिंदुस्थान टिकवण्यासाठी एका दुपारी मेला, ह्याची जाणिव ठेवण्यासाठी तरी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

एक विचार .... वाचलेला

पेट्रोल महागणार ...
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?

ओ.बी.सी. कोटा वाढणार ...
माझे शिक्षण झाले ... मला काय त्याचे?

जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला ...
जेसिका माझी कोणीच नव्हती ... मला काय त्याचे?

शेअर बाजार पडला ...
मी कुठे पैसे गुंतवले होते ... मला काय त्याचे?

हिंदू देवतांची विटंबना होतेय ...
मी धर्मांध नाही ... मला काय त्याचे?

२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या ...
मी काश्मीरी नाही ... मला काय त्याचे?

शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही ...
मी तर नोकरदार आहे ... मला काय त्याचे?

सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय ...
आपल व्यवस्थीत चाललय ना ... मला काय त्याचे?

आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत ...
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? ... मला काय त्याचे?


या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे ...
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे ...
मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे ...

आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे ...
मला काय त्याचे मला काय त्याचे ...
म्हणत म्हणत जगायचे ...